SAHAJEEVAN YATRI - By Geeta Samvatsar


सहजीवन यात्री...


ही गोष्ट मला कशी सुचली हे सांगतांना कथेच्या लेखिका सौ.गीता संवत्सर सांगतात....
मी सध्या आस्था फाऊंडेशन ह्या संस्थेत स्वयंसेवक म्हणून कार्य करते. ही संस्था 'आनंददायी व्रुध्दापकाळ'(joyful old-age,)ह्यासाठी कार्यरत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लोकसंख्येतील जलदगतीने वाढते प्रमाण, वाढलेले वयोमान,बदलती व गतिमान जीवनशैली, विभक्त कुटुंब पध्दती, स्त्रीची अर्थार्जनासाठी घरातून अनुपस्थिती, वाढती आत्मकेंद्रित मनोवृत्ती, ऐहीक सुखासाठी सुरु असलेली स्पर्धा, विस्कटत चाललेल्या नात्यातील विणी,समष्टीपेक्षा 'मी'ला प्राधान्य, वाढत्या आर्थिक गरजा,समाधानाची उणीव, मानसिक स्तरावर अशांतता ,सोशल मिडीयामुळे आलेली व्यस्तता अशा आणखीन कितीतरी कारणांमुळे आता समाज व कुटुंब व्यवस्थेचे चित्र खूप बदलले आहे. घरात ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करायला,त्यांच्याशी संवाद साधण्यास कुणालाही वेळ नाही. त्यांची घरातील उपयुक्तता कमी झाल्याने साहजिकच किंमतही कमी होते. मग त्यांचा सन्मान, आत्मप्रतिष्ठा सगळ्यालाच धक्का लागतो. वाढते शारीरिक, मानसिक व काही अंशी आर्थिक परावलंबित्व ,आयुष्याच्या संध्याकाळी आधाराचा भक्कम खांब शोधत असत.
अर्थात वर नमुद केलेल्या परिस्थितीला भारतीय भक्कम कुटुंब संस्था व संस्कारांमुळे अजून बरीच घरे अपवाद आहेत,पण अशा घरातील तरुण मंडळीची ओढाताण होते. ह्या सामाजिक प्रश्नावर उपाय योजना लवकरात लवकर व समाज प्रबोधनानेच ह्वायला हवी. ह्या द्रुष्टीने ही कथा लिहीण्याचे प्रयोजन.।। (Maharashtra Times 11-12-2019)